नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज 10 व्या दिवशी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू झालं. आजही दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता होती. मात्र अल्पावधीतच ही शक्यताही पूर्णपणे खरी ठरली. गुरुवारी अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यामुळं झालेल्या गदारोळामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. आजही संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून विरोधकांनी गदारोळ सुरु केला. यावरुन राज्यसभेतही जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. इतकचं नव्हे तर लोकसभेचं कामकाज आज सुरू होताच तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.
पंतप्रधानांनी यावर वक्तव्य केलंय का : संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटींवर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, प्रश्न विचारणं आमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल आणि आम्ही यावर राजकारण करतो असं म्हणत असाल तर याचा अर्थ सरकार एकत्रितपणे सर्वसामान्यांच्या चिंतेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी यावर काही वक्तव्य केलंय का? गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी संसदेतील वागणूक समजून घ्यायला हवी.
त्या भाजपा खासदाराला का निलंबित केलं नाही : संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटीवर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला याबाबतीत होणाऱ्या राजकारणाबाबत देशाला सांगावं. याबाबत गृहमंत्र्यांनी बोलावं असं मला वाटतं. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना चर्चा हवी आहे. यात राजकारण काय? तुम्ही विरोधी खासदारांना निलंबित केलं. पण तुमच्या पक्षाचे खासदार वापरून ते संसदेत घुसले आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.
काल 14 खासदारांना केलं होतं निलंबित : संसदेच्या सुरक्षेबाबत गुरुवारी 14 डिसेंबर रोजी दिवसभर सभागृहात गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेतील 14 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं. यात काँग्रेसचे 9, सीपीआय (एम) 2, डीएमके आणि सीपीआयचे प्रत्येकी एक असे एकूण 13 लोकसभा खासदार आहेत. तर टीएमसीचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलंय.
हेही वाचा :