नवी दिल्ली: भारत जोडो यात्रेदरम्यान लोक बोलत असलेले मुख्य मुद्दे म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या हेच प्रामुख्याने होते. यात्रेदरम्यान खूप काही शिकायला मिळाले. लोकांचा आवाज ऐकता आला, असं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितले. बेरोजगारी, महागाईचा उल्लेखही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नाही, मात्र लोक यात्रेत चर्चा करतात, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
जनतेशी बोलण्याची संधी मिळाली: संसदेच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोठे विधान केले आहे. भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले की, आजचे राजकारण आपली जुनी परंपरा हरवत चालले आहे. लोक चालणे विसरत आहेत. सर्व नेते जुन्या परंपरेपासून फारकत घेत आहेत. आम्ही आयोजित केलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेशी बोलण्याची सुवर्णसंधी मिळाली.
काही किमी चालल्यानंतर माझ्यात बदल झाला: भारत जोडो यात्रेवर वक्तव्य राहुल गांधी म्हणाले की, 'आम्ही तीन हजार ६०० किमीची भारत जोडो यात्रा पूर्ण केली आहे, यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. मला सुरुवातीला वाटलं होत की, इतकं अंतर चालणं कठीण जाईल, पण ते शक्य झालं. आजच्या राजकारणात आपण चालण्याची जुनी प्रथा विसरलो आहोत. त्यांच्यात मीही होतो. मी पायी किमान 400 किमी चाललो त्यावेळी त्रास झाला. मात्र रस्त्यात भेटणाऱ्या लोकांचे आवाज ऐकल्यावर मी माझा त्रास विसरून गेलो. त्यांच्यासोबत चालल्यावर माझ्यात बदल झाला. आम्ही हजारो लोकांशी बोललो. जे काही ऐकलं ते पहिल्यांदाच ऐकलं. मग आम्हाला लोकांचे आवाज खोलवर ऐकू येऊ लागले. मग प्रवास आमच्याशी बोलू लागला.
भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांचा मुद्दा: भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांचा मुद्दाही पुढे आला. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हजारो शेतकऱ्यांशीही बोललो. पंतप्रधानांनी किसान विमा योजनेबाबतही चर्चा केली. काही शेतकऱ्यांच्या जमीनी हिसकावून घेण्यात आल्यात. तर काहींनी रास्त भाव मिळत नसल्याचे सांगितले. जमीन हिसकावून घेतली जात असल्याचे आदिवासींनी सांगितले. यात्रेत प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी समस्या आम्हाला आढळल्या. किसान विधेयकाचा मुद्दाही होता, अग्निवीरवरही लोकांनी मतं मांडली.
दरम्यान आज सकाळी संसदेत अदानी वादावर चर्चेची आणि जेपीसीच्या मागणी करत विरोधी खासदारांनी गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आता पुन्हा कामकाज सुरु झाले आहे. सभागृहातील गदारोळामुळे आजही झिरो अवर होऊ शकला नाही. बैठकीच्या सुरुवातीला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सोमवारी सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड विध्वंस झाला असल्याचे सांगितले.