नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहे. संसदेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या गुरुवारच्या भाषणानंतर आज वाचलेल्या भाषणाचा भागही काढून टाकण्यात येणार असल्याचे सभापतींनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि इतर विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन सभापतींच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी वारंवार आग्रह करूनही त्यांनी त्यांच्या जागेवर परत जाण्यास नकार दिला. नंतर त्यांनी अनेक विरोधी खासदारांची नावे घेतली ज्यात काँग्रेसमधील अनेकांचा समावेश होता.
खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव : यानंतर सभागृहनेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या खासदारांना सभागृहातून काढून टाकण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडला. मात्र त्यानंतर त्यांनी खासदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सभागृहाला बोलावावे, अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर बोलताना अध्यक्ष धनखर म्हणाले की, कोणत्याही विरोधी पक्षाच्या सदस्याला सभागृहाच्या कामकाजात भाग न घेण्याचे निर्देश देणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण काम आहे. माझी ती करण्याची इच्छा कधीच नसते. त्यानंतर अध्यक्षांनी सर्व नेत्यांना चर्चेसाठी आणि समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमंत्रित केले.
आरोग्याच्या मुद्यावरून वाद : आज लोकसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि द्रमुकच्या खासदारांमध्ये वाद पाहायला मिळाला. 'मी अशी वैद्यकीय महाविद्यालये चालवणार नाही जिथे पुरेसे प्राध्यापक आणि पायाभूत सुविधा नाहीत. एम्स मदुराईच्या स्थापनेवर काम सुरू आहे. आरोग्याला राजकारणाचा मुद्दा बनवू नका,' असे आरोग्य मंत्री म्हणाले. तत्पूर्वी संसदेबाहेर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राहुल गांधींच्या भाषणात काहीही खोडसाळपणा नाही. हिंडेनबर्ग अहवालात काय आहे ते त्यांनी संसदेत सांगितले. घटनेने आम्हाला संसदेत बोलण्याचा अधिकार दिला आहे. मात्र पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत असंसदीय भाषेत बोलतात. आपण आता एका नवीन देशात आलो आहोत की काय असे वाटते आहे.
'राहुल गांधी असंबद्ध होते' : अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, 'टीका करणे ही वेगळी बाब आहे. आम्ही टीका ऐकायला तयार आहोत. पण सत्यता नसताना बिनबुडाचे आरोप किंवा बिनबुडाची भाषा वापरणे योग्य आहे का?'. पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, 'संसद स्थापन झाल्यापासूनच संसदेतील असंसदीय भाषा काढून टाकण्याची परंपरा आहे. अध्यक्षांच्या भाषणावर राहुल गांधी अत्यंत असंबद्ध बोलत होते आम्ही तुम्हाला ते सिद्ध करायला सांगितलं होतं, पण तुम्ही तसं केलं नाही'.
'पंतप्रधानांच्या बोलण्यात अहंकार' : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधानांचे भाषण केवळ स्वत:च्या स्तुतीसाठी होते. आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. बेरोजगारी, महागाई, अदानी प्रकरण, खाजगीकरण यावर त्यांनी उत्तर दिले नाही. एक म्हणाले की केवळ एक व्यक्तीत देशाला वाचवू शकते व मी सर्वांवर भारी पडतो आहे. त्याच्या या बोलण्यातून त्यांचा अहंकार दिसतो आहे.
हेही वाचा : LIC Adani Meet : एलआयसीच्या अधिकाऱ्यांची अदानी समूहासोबत बैठक, एलआयसीला तिसऱ्या तिमाहीत झाला इतका नफा