नवी दिल्ली Parliament Attack : संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापन दिनी लोकसभेच्या सुरक्षेतील ढिसाळ कारभार समोर आला आहे. बुधवारी सभागृहाचं कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि खासदारांच्या बाकापर्यंत पोहोचले. या तरुणांनी हवेत रंगीत गॅस सोडला. त्यामुळे सभागृहात धुराचे लोट पसरले होते. लोकसभेत ही घटना घडली, त्याचवेळी संसेदबाहेर एक तरुण आणि एका महिलेनं घोषणाबाजी केली. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
सहा जणांनी मिळून कट रचला : सहा जणांनी मिळून या घटनेचा कट रचला होता. हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. लोकसभेत घुसलेला एक तरुण उत्तर प्रदेशचा आहे, तर दुसरा कर्नाटकचा आहे. तर संसदेबाहेर गोंधळ घालणारा तरुण लातूरचा असून महिला हरियाणाची रहिवासी आहे. या चौघांनी मिळून हा गुन्हा का केला? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
लोकसभेत घुसणारा सागर रिक्षा चालवतो : संसदेच्या सुरक्षेचा भंग करून सभागृहात उडी मारणारा सागर शर्मा हा लखनऊचा रहिवासी आहे. तो तेथे ई-रिक्षा चालवतो. सागर काही महिन्यांपूर्वीच बेंगळुरू येथून परतला होता. तेव्हापासून तो स्वत:ची रिक्षा घेण्याबद्दल बोलत होता. सागर हा मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचं १२ वीपर्यंत शिक्षण झालं असून वडील सुतारकाम करतात. त्याचं कुटुंब गेल्या २० वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. सागरच्या आईनं सांगितलं की, 'तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता.'
दुसरा तरुण कॉम्प्युटर इंजिनिअर आहे : लोकसभेत घुसणाऱ्या दुसऱ्या तरुणाचं नाव मनोरंजन असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. तो उच्चशिक्षित असून त्यानं कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केलं आहे. मनोरंजनच्या वडिलांनी ईटीव्ही भारतशी बोलताना घडलेल्या घटनेवर निषेध व्यक्त केला. "संसद आमच्यासाठी मंदिरासारखी आहे. माझ्या मुलाची संसद भवनात प्रवेश करण्याची पद्धत चुकीची होती. असं कोणीही करू नये", असं ते म्हणाले. आम्ही शेतकरी कुटुंबातून येतो. माझ्या मुलाला एक संघटना काढायची होती. त्याशिवाय त्याची शेतकरी आणि गरीबांना मदत करण्याची इच्छा होती. तो कुठे जात आहे हे मला माहीत नव्हतं. दिल्लीला जातोय, नंतर परत येईन, असं सांगून तो दोन दिवसांपूर्वी गेला होता, असं त्यांनी सांगितलं.
महिला हरियाणाची रहिवासी : सुरक्षा दलांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं. त्यापैकी एक महिला आहे. ४२ वर्षीय नीलम कौर असं तिचं नाव असून ती हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवासी आहे. नीलम सध्या हिसारमध्ये शिक्षण घेते. नीलमच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, ती हरियाणा सिव्हिल सर्व्हिससाठी तयारी करत होती. ती कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. नीलमच्या भावानं सांगितलं की, तो सकाळीच तिच्याशी बोलला होता. टीव्हीवरच्या बातम्या पाहूनच आम्हाला घटनेची माहिती मिळाली. तिनं हे असं का केलं याबद्दल काहीच माहित नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
लातूरचा शेतमजूर ताब्यात : संसद बाहेरून ताब्यात घेण्यात आलेला दुसरा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील आहे. अमोल शिंदे (२५) असं त्याचं नाव असून तो चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील रहिवासी आहे. तो फारसा शिकलेला नाही. तो शेतमजूर म्हणून काम करतो. त्याचे आई-वडील भूमिहीन शेतमजूर असून ते इतरांच्या शेतात काम करतात. त्यांचं गाव लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या तालुक्यात आहे.
हे वाचलंत का :