पणजी (बाणावली) - अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री हे स्वतः गृहविभागाचे मंत्री असून, त्यांच्याच खात्याच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी प्रशचिन्ह उभे केले आहे. रविवारी उशीरा 10 मुलांचे टोळके बाणावली समुद्रकिनारी वाढदिवस साजरा करायला गेले होते. त्यातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला होता. तर, दोन मुलांना मारहाण करून जखमी करण्यात आले होते. दरम्यान, या गुन्ह्याची नोंद कोळवा पोलीस स्थानकात झाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील संबंधीतांना अटक केली आहे.
'पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी'
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेजबाबदार व्यक्तव्य करत आपल्या मुलांची आपण काळजी घ्यायला हवी, त्यांना रात्री उशिरापर्यंत पार्टीला जाताना परवानगी देता कामा नये. तसेच, अशा पालकांनी नेहमीच पोलीस किंवा सरकारवर अवलंबुन न राहता आपल्या मुलांची आपणच काळजी घ्यायला हवी असेही सावंत म्हणाले आहेत.
'सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी'
मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी आपल्या वाक्याचा पुनरुच्चार करत आपल्या मुलांना पार्टीला जाताना पालकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, दोषींवर कारवाई झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.