नवी दिल्ली : 2021 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सरकारने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, 'उद्या शौर्यदिनानिमित्त भारतमातेच्या वीर बालकांच्या स्मरणार्थ एक विशेष कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यात सहभाग होणार आहे. या दरम्यान अंदमान-निकोबारमधील 21 अनामिक बेटांना 21 परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली जातील. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत प्रकाशनानुसार, पंतप्रधान मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपवर नेताजींना समर्पण म्हणून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण करतील.
रॉस बेटांचेही नामकरण केले होते : अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन नेताजींच्या स्मृतींना सन्मानित करण्यासाठी, रॉस बेटांचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे करण्यात आले होते. पंतप्रधानांनी 2018 मध्ये या बेटाला भेट दिली होती. नील बेट आणि हॅवलॉक बेट या बेटांचे देखील नाव बदलून शहीदद्वीप आणि स्वराजद्वीप असे नामकरण करण्यात आले होते. 'देशातील वास्तविक जीवनातील नायकांना योग्य आदर देण्यास पंतप्रधानांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या भावनेने पुढे जात आता बेट समूहातील 21 सर्वात मोठ्या अनामिक बेटांना 21 परम वीर चक्र पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे पीएमओने निवेदनात म्हटले आहे.
हे 21 परमवीरचक्र विजेते : या 21 बेटांची नावे या परमवीरचक्र विजेत्यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत - मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि हॉनी कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंह, लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंह, कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंह थापा, सुभेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, सीक्यूएमएच अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, एफ. अधिकारी निर्मलजीत सिंह सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव.
सेंट्रल हॉलमध्ये पुष्पहार अर्पण करणार : पंतप्रधान मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षांचे नेते, संसद सदस्य, माजी खासदार आणि इतर मान्यवर संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पोर्ट्रेटचे अनावरण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एन संजीव रेड्डी यांच्या हस्ते 23 जानेवारी 1978 रोजी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आले होते.
गेल्या वर्षी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण : 23 जानेवारी 1897 रोजी जन्मलेल्या नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैपेई येथे झालेल्या विमान अपघातात बोस यांच्या मृत्यूबद्दल वाद अजूनही चालू आहे. केंद्र सरकारने 2017 मध्ये एका आरटीआय मध्ये या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. गेल्या वर्षी नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्लीतील इंडिया गेट येथे त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते.