कोलकाता Gaganayaan : इस्रोचं पुढील मुख्य ध्येय मानवाला अंतराळात पाठवणं आणि त्याला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणं असल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले. ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) कोलकाताच्या राजभवनात 'विज्ञान आणि विश्वास' या विषयावरील चर्चेत सहभागी झाले होते.
गगनयान प्राथमिक ध्येय : "भविष्यात अनेक महत्त्वाची ध्येय आहेत. प्राथमिक ध्येय म्हणजे गगनयान. मानवाला अवकाशात पाठवणं आणि त्याला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणं हे आमचं ध्येय आहे", असं एस सोमनाथ यांनी सांगितलं. सोमनाथ कोलकता येथील राजभवनात ग्लोबल एनर्जी संसदेच्या १३ व्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रयान ३ च्या यशाचाही उल्लेख केला.
'जी २०' नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल : यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एस सोमनाथ यांनी इस्रोशी संबंधीत अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला. "चंद्रयान ३ चे यश त्यामागील मेहनत अधोरेखित करते, असं ते म्हणाले. नजीकच्या भविष्यात 'जी २०' नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जी २० अधिवेशनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. जी २० उपग्रह केवळ जी २० देशांचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं हित साधेल. त्यादृष्टीनं तयारी सुरू आहे. याद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान, शांतता आणि जागतिक घडामोडी, पर्यावरण, संस्कृती आणि मानवी संसाधनांच्या विकासाची काळजी घेतली जाईल", असं त्यांनी नमूद केलं.
एस सोमनाथ यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी एस सोमनाथ यांना राज्यपाल उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केला. स्वत: राज्यपाल बोस यांनी इस्रो प्रमुखांना या पुरस्कारानं गौरवलं. यावेळी बोलताना एस सोमनाथ यांनी त्यांच्या सहकाऱ्याचं आभार मानलं. "हा सन्मान मिळाल्यानं मी भारावून गेलो आहे. यामुळे एकत्र काम करण्यास बळ मिळेल", असं ते म्हणाले.
ग्लोबल एनर्जी संसद काय आहे : ग्लोबल एनर्जी संसद (GEP) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. २०१० मध्ये तिची स्थापना झाली. तेव्हापासून, जीईपीनं यूके, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, थायलंड आणि श्रीलंका यासह विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सत्रं आयोजित केले आहेत.
हेही वाचा :