सुरत - गुजरातमधील एका मेंदू मृत झालेल्या अडीच वर्षांच्या मुलाने रशिया आणि युक्रेनमधील दोन मुलांसह एकूण पाच मुलांना जीवदान दिले. अपघातात मेंदू मृत झाल्याचे घोषित झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी अवयवदान केले.
'जश संजीव ओझा असे या मुलाचे नाव असून त्याला शेजारच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला होता. या अपघाताच्या काही दिवसांनंतर डॉक्टरांनी या लहानग्याचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले होते,' अशी माहिती एका स्वयंसेवी संस्थेने बुधवारी दिली. या संपूर्ण प्रक्रियेत या संस्थेने मदत केली.
'अडीच वर्षांच्या मुलाचे हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत आणि डोळे त्याच्या कुटुंबाच्या संमतीनंतर दान केले गेले,' असे या संस्थेने म्हटले आहे. 'डोनेट लाईफ' असे या संस्थेचे नाव आहे.
हेही वाचा - 'नवे कृषी कायदे एका रात्रीत झाले नाहीत'
मरावे परी 'अवयवरूपी' उरावे
'डोनेट लाइफ या स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यानंतर या मुलाच्या पालकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्या जशचे वडील संजीव ओझा पत्रकार आहेत. त्यांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला,' असे संघटनेने म्हटले आहे.
अवयवांची गरज असलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्यानंतर हृदय व फुफ्फुसांना रुग्णालयातून सुरतच्या विमानतळावर नेण्यात आले आणि तेथून एअर अॅम्ब्युलन्सने थेट चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात नेले. हे सुमारे 1 हजार 615 किलोमीटरचे अंतर केवळ 160 मिनिटांत पार करण्यात आले.
'मंगळवारी रात्री अवयवदान केले गेले होते. यानंतर रुग्णालयापासून रुग्णवाहिका सुरत विमानतळावर काही मिनिटांतच पोहोचण्यास मदत करणारा ग्रीन कॉरिडोर तयार करण्याची सर्व व्यवस्था केली होती. हे सर्व डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मदतीने झाले आहे,' असे सुरतस्थित एनजीओ डोनेट लाइफचे अध्यक्ष नाइल्स मंडलेवाला म्हणाले.
पाच जणांना मिळाले जीवदान
अडीच वर्षांच्या जशच्या हृदयाचे रशियामधील चार वर्षांच्या मुलामध्ये आणि युक्रेनमधील एका मुलामध्ये फुफ्फुसांचे प्रत्यारोपण झाले. त्याची दोन मूत्रपिंडे अहमदाबादमधील 14 आणि 17 वर्षांच्या दोन मुलींमध्ये आणि यकृत भावनगरमधील दोन वर्षांच्या मुलामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे कॉर्निया लोक द्रष्टी चक्षू बँकेला दान करण्यात आले.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न