नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मंगळवारी अदानी प्रकरणावर संसदेच्या कॉरिडॉरच्या बाल्कनीमधून निषेध व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) द्वारे चौकशीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर येऊन आंदोलन केले. संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून ते बॅनर्स हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करताना दिसले.
कामकाज दिवसभरासाठी तहकूब : चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून, हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी मुद्द्यावरून सभागृहात गोंधळाचे वातावरण आहे. अदानी समुहाने आर्थिक फेरफार केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केल्यानंतर त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत, अशी विरोधकांनी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्याने राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
भाजपची राहुल गांधींच्या माफीची मागणी : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे बोलण्यासाठी उठले तेव्हा भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भाषणादरम्यान भारतीय लोकशाहीवर हल्ला केला, असा आरोप करत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे अधिवेशन चालू झाल्यापासून सभागृहाचे कामकाज होऊ शकलेले नाही.
पंतप्रधानांकडून उत्तरे मागितली : सरकारने जेपीसीची मागणी मान्य न केल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा सभागृहाबाहेर निदर्शने केली आहेत. काही दिवसांपूर्वी, वादग्रस्त अदानी प्रकरणावर विरोधी पक्षांनी संसदेपासून दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला होता. आंदोलक नेत्यांनी नरेंद्र मोदी सरकारकडे हिंडेनबर्ग अहवाल, महागाई, भ्रष्टाचार आणि इतर अनेक मुद्द्यांवर उत्तरे मागितली आहे.
हे ही वाचा : Budget Session 2023 : दोन्ही सभागृहात गोंधळ, राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज ४ वाजेपर्यंत स्थगित