हाफलोंग (आसम) - आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजपा उमेदवाराच्या गाडीत आढळले ईव्हीएम आढळल्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील मतदान केंद्रावर फक्त 90 मतदारांची नोंदणी होती. मात्र, एकूण 171 मतदान झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित मतदान केंद्र हाफलोंग विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलला मतदान झाले होते. हाफलोंगमध्ये 74 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यातील एका मतदान केंद्रावर फक्त 90 मतदारांची सुची होती. मात्र, तिथे 171 मतदानाची नोंद झाली. याप्रकरणी निवडणूक आयोगाने पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. हे मतदान केंद्र खोटलिर एलपी स्कूलच्या 107 (ए) मध्ये होते. या मतदान केंद्रात आता पुन्हा मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे -
बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने एस ल्हांगुम (सेक्टर ऑफिसर), प्रह्लाद सी रॉय (पीठासीन अधिकारी), परमेश्वर चारंगसा (प्रथम मतदान अधिकारी), स्वराज कांति दास (द्वितीय मतदान अधिकारी) आणि एल थीक (तृतीय मतदान अधिकारी) यांना निलंबित केले आहे.
गावप्रमुखांकडे वेगळी मतदार यादी -
गावप्रमुखांनी मतदार यादी स्वीकारण्यास नकार दिला आणि ते आपली यादी घेऊन आले. यानंतर गावातील लोकांनी त्याच यादीनुसार मतदान केले, असे एका अधिकाऱ्यांना सांगितले. तथापि, निवडणूक अधिकाऱयांनी गावाच्या प्रमुखांची मागणी का मान्य केली, तेथे सुरक्षा कर्मचारी तैनात होते का, आणि त्यांची भूमिका काय होती हे, अद्याप कळू शकलेले नाही.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका