नवी दिल्ली - दिल्लीच्या नोएडामधील (Noida) कासना ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीत एक दुःखद घटना घडली आहे. आईवडील आणि कुटुंबीयाचे लक्ष नसल्याने दारातून रांगत रांगत घराबाहेर आलेलं बाळ 12 व्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना इथे घडली आहे. ऐन पहिल्या वाढदिवासालाच बाळाचा मृत्यू झाल्यानं बाळाच्या आईवडिलांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
जन्मदिनीच बाळाचा मृत्यू -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलीस ठाणे हद्दीतील सतेंद्र कसाना हे अ1, 1206 कासा ग्रीन वन सोसायटी सेक्टर 16 नोएडा येथे राहतात. त्यांचा एक वर्षीय मुलगा रिवान कसाना हा अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर खेळत होता. खेळता खेळता तो पायऱ्यांकडे कधी गेला हे घरच्यांना कळलेच नाही. त्याच दरम्यान तो 12 व्या मजल्यावरून पायऱ्यांमधून थेट तळमजल्यावर पडला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याचा आजच वाढदिवस होता अशी माहिती त्यांनी दिली.
तेव्हा फार उशीर झाला होता -हरीश चंदर
यावेळी डीसीपी हरीश चंदर यांनी असे सांगितले की, दिल्लीच्या नोएडामधील (Noida) कासना ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाला 1 वर्षांचा मुलगा होता. रांगत रांगत तो कधी गेटच्या बाहेर गेला, हे कुणालाच समजले नाही. बाहेर गेल्यानंतर जिन्यापाशी लावलेल्या रेलिंगमधून तो पलिकडे गेला आणि क्षणार्धात बाराव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जाऊन पडला. गेटच्या बाहेरही त्यावेळी कुणी नसल्यामुळे कुणाला काही कळले नाही. जेव्हा बाळ कोसळल्याचे समजले, तेव्हा फार उशीर झाला होता.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अशी केली अटक, बघा VIDEO