नवी दिल्ली - राजधानीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. अशरफ नवाज खान असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर अंकुर शुक्ला असे गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना दिल्ली आयआयटीच्या जवळ मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. गंभीर विद्यार्थ्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विद्यार्थी आयआयटीत करत होते पीएच डी : दोन्ही विद्यार्थी दिल्ली आयआयटीत पीएच डी करत होते. दोन्ही विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती दिल्लीच्या साऊथ वेस्टचे पोलीस उपायुक्त मनोज सी यांनी दिली. यातील अशरफ नवाज खान (30) याला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा विद्यार्थी अंकुर शुक्ला (29) याला मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला जबर मार लागलेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भरधाव कारने दिली धडक : आयआयटीचे हे दोन्ही विद्यार्थी एसडीए बाजाराजवळून रेस्टॉरंटमध्ये जात होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना नेहरू प्लेसकडून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना चिरडले. ही कार भरधाव होती. कारच्या चालकाची पोलिसांनी ओळख पटवली आहे. मात्र त्याला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
31 डिसेंबरला कारने चिरडली होती स्कूटी : मागील वर्षाच्या शेवटी अगदी 31 डिसेंबरला रात्री दीड वाजता सारे जग आनंद लुटत असताना कंझावाला परिसरात कार चालकाने स्कूटीला चिरडले होते. या स्कूटीवर अंजली आणि तिची मैत्रिण बसलेली होती. यावेळी कारने अंजलीला 12 किमी फरफटत नेले होते. तर अंजलीची मैत्रिण जाग्यावरच पडलेली होती. या घटनेत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली होती. त्यातील अंकुश खन्ना याला न्यायालयाने 7 जानेवारीला जामीन दिला होता. न्यायालयाने 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन दिला होता. वेळ पडेल तेव्हा चौकशीसाठी हजर व्हावे लागेल अशी अटही न्यायालयाने घालून दिली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
हेही वाचा - Thane Crime News : मैत्रणीच्या वादातून विद्यार्थ्यावर हल्ला, दोन आरोपी विद्यार्थी अद्याप फरार