श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी टि्वट करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. जम्मू काश्मीर प्रशासनाने माझ्या वडिलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता नजरकैदत ठेवले. हा 2019 नंतरचा नवा जम्मू काश्मीर आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपांना श्रीनगर पोलिसांकडून टि्वटरच उत्तर देण्यात आलं आहे.
आम्हाला कोणत्या स्पष्टीकरणाशिवाय घरात बंद करून ठेवलं आहे. त्यांनी मला, माझ्या वडिलांना ( जे एक खासदार आहेत)आणि इतर कुटुंबीयांना घरात कैद करून ठेवलं आहे, असे ते म्हणाले.
जम्मू काश्मीर प्रशानसाचे नाव घेता त्यांनी आणखी एक टि्वट केले. आम्ही आमच्या घरामध्ये कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय बंद राहावं, हे तुमचे नव्या जम्मू काश्मीचे मॉडेल आहे. घर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरामध्ये प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये राग व्यक्त केल्यास तुम्हाला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले. येथील घराबाहेर पोलिसांची वाहने उभी असल्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. घरामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही आत येऊ देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
श्रीनगर पोलिसांचे ओमर यांच्या आरोपांना उत्तर -
ओमर अब्दुला यांनी टि्वट केल्यानंतर श्रीनगर पोलिसांनी त्यांनी टि्वटरवरच उत्तर दिलं आहे. लेथपोरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष झाली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिकूल सूचना मिळाल्यानं कोणत्याही व्हीआयपी व्यक्तींनी कोणताही कार्यक्रम ठेवू नये अशी सूचना यापूर्वीच दिली होती, असे श्रीनगर पोलिसांनी टि्वट केले आहे.
ओमर यांचे पोलिसांना प्रश्न -
श्रीनगर पोलिसांनी टि्वट केल्यानंतर पुन्हा ओमर अब्दुला यांनी टि्वट केले आहे. हे टि्वटर खाते खरेच आहे की नाही, याबाबत सांशकता आहे. कारण, हे अकाऊंट व्हेरिफाईड नाही. तरीही मी हे खाते पोलिसांचेच असल्याचे गृहित धरतो. कृपया मला सांगा की, तुम्ही मला माझ्या घरात कोणत्या कायद्याखाली बंद केले आहे. तुम्हा घरात थांबा असा सल्ला देऊ शकता. मात्र, सक्ती करू शकत नाही, असे टि्वट ओमर यांनी केले आहे.