फरीदाबाद (हरियाणा) : नूह हिंसाचार प्रकरणी तावडू सीआयए पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी हिंसाचार भडकवण्याचा आरोप असलेल्या बिट्टू बजरंगीला फरीदाबाद येथून अटक केली. बिट्टू बजरंगीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषणे देऊन नूहमध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे.
फरीदाबाद येथील राहत्या घरातून अटक केली : सीआयए तावडू पोलिसांनी बिट्टू बजरंगीला त्याच्या फरीदाबाद येथील राहत्या घरातून अटक केली. नूह पोलिसांचे सुमारे २० कर्मचारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास फरीदाबाद येथील त्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी बिट्टू बजरंगीला अटक केली.
पोलीस चौकशीत नूह हिंसाचाराचा खुलासा होण्याची शक्यता : अतिरिक्त पोलीस अधीक्षक उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या कलमांमध्ये हिंसा भडकावणे आणि दरोडा यांसारख्या कलमांचा समावेश आहे. या एफआयआरवर कारवाई करत पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अटक केली. आता नूह पोलीस बिट्टू बजरंगीची रिमांडवर चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीत नूह हिंसाचाराचा संपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे.
हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू, ६० हून अधिक जखमी : ३१ जुलै २०२३ रोजी हरियाणातील नूह जिल्ह्यात हिंदू संघटनांनी ब्रजमंडल यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. या दरम्यान ५० हून अधिक वाहने जाळण्यात आली. या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक लोक जखमी झाले होते.
मोनू मानेसरला अटक होणे बाकी : नूह हिंसाचारासाठी दोन लोकांना जबाबदार धरण्यात आले होते. पहिला मोनू मानेसर आणि दुसरा बिट्टू बजरंगी. या दोघांवरही लोकांना भडकावल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बिट्टू बजरंगी याला अटक केली आहे. मात्र मोनू मानेसरला अजूनही अटक होणे बाकी आहे.
हेही वाचा :
- Nuh Violence : हरियाणामधील 7 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू; हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू, बुधवारी मानेसरमध्ये हिंदु संघटनांची पंचायत
- Haryana Nuh Violence : नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, 116 जणांना अटक, गुन्हेगाराला सोडणार नाही : मुख्यमंत्री खट्टर
- Haryana Nuh Violence : हरियाणामधील अनेक जिल्ह्यांची इंटरनेट सेवा बंद, आतापर्यंत 165 जणांना अटक