तिनसुकिया : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ईशान्येकडील भारत-म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला झाला. अरुणाचल आणि नागालँडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आसाम रायफल्सची ULFA-I आणि NSCN दहशतवाद्यांशी चकमक झाली. आसाम रायफल्सने अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील पंचुपास भागात नवीन छावणी उभारली होती. NSCN-IM आणि ULFA-I च्या अतिरेक्यांनी मंगळवारी पहाटे 3 वाजता छावणीवर हल्ला केला. अरुणाचलमधील नाकानो भागात लष्कराच्या आणखी एका छावणीवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दुसरीकडे नागालँडच्या चेरामोटा येथील लष्कराच्या तळावरही याच दहशतवादी गटाने हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कॅम्पवर मोर्टारने हल्ला केला. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सुमारे तीन वर्षांनंतर, उल्फा-I सह ईशान्येतील बंडखोर गटांनी स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ULFA-I कमांडर-इन-चीफ परेश बरुआ यांनी यापूर्वीच स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, ULFA-I ने स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार टाकण्याची हाक दिली हे नवीन नाही. काळजी करण्याचे कारण नाही आणि स्वातंत्र्यदिन शांततेत साजरा केला जाईल.