नवी दिल्ली - अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्याशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी फोनवर चर्चा केली. दहशतवादाच्या प्रश्नासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर भारत-अमेरिका मिळून काम करेल, असे एकमत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये झाले. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सौदार्ह टिकवण्यासंबंधी दोघांमध्ये चर्चा झाली.
भारत अमेरिकेपुढे समान संकटे -
भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी मिळून काम करायला हवे. दोन्ही देशांचे समान हितसंबंध आणि मुल्यांचे रक्षण करण्यासाठी भविष्यात काम करण्यात येईल, याबाबत चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. भारत अमेरिकेचे संबंध समान मूल्ये, रणनितीक आणि सुरक्षासंबंधीच्या मुद्द्यांवर उभे आहेत. त्यामुळे दोन्ही देशांपुढील आव्हाने एकत्र येऊन सोडवायला हवीत, या विषयी चर्चेत एकमत झाले. कोरोना महामारीनंतरची आव्हाने सोडविण्यासाठीही भारत अमेरिकेत सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.
जेक सुलिवान यांना दिल्या शुभेच्छा -
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि अमेरिकेचे समपदस्थ जेक सुलिवान यांच्यात २७ जानेवारी रोजी चर्चा झाली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल अजित दोवाल यांनी सुलिवान यांना शुभेच्छा दिल्या. खुल्या आणि सर्वसमावेशक जगासाठी आघाडीच्या लोकशाही देशांनी एकत्र येऊन काम करायला हवे. भारत आणि अमेरिका यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. दहशतवाद, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, प्रादेशिक शांतता या मुद्द्यांवर दोन्ही देश एकत्र येऊन काम करतील, असे अजित दोवाल यांनी फोनवर म्हटल्याचे अधिकृत वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.