नवी दिल्ली Notice To Mahua Moitra : संसद वेबसाईटचा पासवर्ड आणि यूझर आयडी उद्योगपतीला दिल्याचा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर आरोप आहे. आता पुन्हा एकदा खासदार महुआ मोइत्रा अडचणीत सापडल्या आहेत. महुआ मोइत्रा यांना आता खासदारांसाठी देण्यात आलेला बंगला खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
महुआ मोईत्रांनी दिला संसदेच्या वेबसाईटचा पासवर्ड : खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेच्या वेबसाईटचा यूझर आयडी आणि पासवर्ड उद्योगपतीला दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या उद्योगपतीकडून महुआ मोइत्रा यांनी गिफ्ट स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. याप्रकरणी संसदेच्या समितीनं त्यांना दोषी असल्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना 8 डिसेंबरला संसदेतून काढून टाकण्यात आलं होतं. खासदारकी गेल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
सरकारी बंगला करावा लागणार खाली : खासदारकी गेल्यानंतर महुआ मोइत्रा यांना 7 जानेवारीपर्यंत सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्यापही महुआ मोइत्रा यांनी बंगला खाली केला नाही. त्यामुळं इस्टेट विभागानं महुआ मोइत्रा यांना मंगळवारी पुन्हा नोटीस बजावली आहे. महुआ मोइत्रा यांनी बंगला खाली केला की, नाही याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक पाठवलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महुआ मोइत्रा यांना यापूर्वी बजावण्यात आल्या नोटीस : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर सरकारी बंगला खाली करण्यासाठी त्यांना डीओईकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र बंगला खाली केला नसल्यामुळं महुआ मोइत्रा यांना पुन्हा 12 जानेवारीला दुसरी नोटीस बजावण्यात आली होती.
हेही वाचा :