नवी दिल्ली - 'भारतीय लष्कराचा संयम पाहण्याची घोडचूक कोणीही करू नका. चर्चा आणि राजकीय मार्गाने सीमावाद सोडवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. एकतर्फी सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारताने सडेतोड उत्तर दिलं असून गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले. राजधानी दिल्लीत लष्कर स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असून सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करत असल्याचेही ते म्हणाले.
सीमावाद शांततेत सोडवण्यासाठी भारत कटीबद्ध -
मागील दहा महिन्यांपासून भारत-चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी आपल्या संबोधनातून चीनला कठोर शब्दात उत्तर दिले. भारत शांततेने आणि चर्चेच्या मार्गाने सीमावाद सोडवण्यास कटीबद्ध असून लष्कराचा संयम पाहण्याची घोडचूक कोणीही करू नये असे म्हणत चीनला इशारा दिला. लष्कर स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील जनरल करिअप्पा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्करी कवायती करत जवानांनी कौशल्य दाखवले. तसेच परडेही केली.
गलवान खोऱ्यातील शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही -
मी तुम्हाला विश्वास देतो की, गलवान खोऱ्यातील शहिदांचे बलिदान वाया जाणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला जराही धक्का लागू देणार नाही. सीमेवर सुरू असलेल्या वादातून मार्ग काढण्यासाठीचे प्रयत्न आम्ही सुरूच ठेवले आहेत. मात्र, हा तोडगा दोघांनाही हितकारक आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असेल, असे नरवणे म्हणाले. भारत-चीन सीमावाद सोडवण्यासाठी चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्याचेही त्यांनी सांगितले.
गलवान खोऱ्यातील तणाव अद्यापही कायम -
मागील वर्षी मार्च महिन्यात चीनने भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख भागात घुसखोरी करून काही प्रदेशावर ताबा मिळवला आहे. या भागातून चीनने मागे हटण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सीमेवरील तणाव वाढला होता. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर दोन्ही देशांकडून सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून युद्धसज्जता ठेवण्यात आली आहे.