भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा त्या आपल्या विधानावरून चर्चेत आल्या आहेत. राहुल गांधी यांच्याशी कोणतीच मुलगी लग्न करू इच्छित नाही आणि ते देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, अशी वादग्रस्त टीका प्रज्ञा सिंह यांनी केली आहे.
शेतकर्याचे काम शेती करणे, कापणी करणे आणि देशाला अन्न पुरवणे आहे. देशात प्रत्येकाला एक वेगळे आणि सर्वोत्तम स्थान आहे. प्रत्येकाची राष्ट्राप्रती आदाराची भावना आहे. शेतकरी मजबूत असतील. तर आपल्याला सैनिकांची गरज नाही, असं काही दोन तोंडी लोक म्हणतात, अशी टीका त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली.
प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे. यासाठी त्यांनी आधी त्या पदासाठी पात्र व्हावं. विवेक, बुद्धीमत्ता, संस्कृति आणि शिष्टाचार नसेलले विधर्मी लोक काहीही बोलतात. देशातील लहान-लहान मुलेही राहुल गांधींवर हसतात. कोणतीच मुलगी त्यांच्याशी लग्न करण्यास इच्छूक नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आपला मुलगा पंतप्रधान व्हावा, अशी स्वप्न त्यांची आई इटलीमध्ये बसून पाहत आहे, असेही त्या म्हणाल्या.
आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य -
भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होतं. कृषी कायदे हे योग्य असून त्याविरोधात आंदोलन करणारे हे शेतकरी नसून अफवा पसरवणारे दुसरे लोक आहेत. हे शेतकऱ्यांच्या वेषात काँग्रेस आणि वामपंथी लोक आहेत. या सर्वांना तुरुंगात डांबल पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसेच एका सभेत त्यांनी शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना का वाईट वाटतं, असं वादग्रस्त विधान जातीव्यवस्थेबाबत केलं होतं.