नवी दिल्ली - दोषींना कडक शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या भागात लवकरच शांती निर्माण होणार आहे. लवकरच आपण मणिपूरला पहिल्याप्रमाणे पाहणार आहोत. येथील महिला आणि नागरिकांना मी विश्वास देतो की, सरकार, संसद तुमच्या सोबत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मुद्द्यावर सभागृहात निवेदन केले आहे.
सरकार मणिपूरवासियांसोबत उभे - मणिपूरमध्ये जे काही चालले आहे ते दुर्दैवी असून, दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठामपणे उभा आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्याआधी विरोधकांनी सभात्याग केला होता.
मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका - सत्तेत नसेल तर विरोधकांची काय अवस्था होते ते दिसत आहे. काही जण भारतमातेच्या मृत्यूचे वक्तव्य करतात. हे ज्यांच्या मनात आहे तेच त्यांच्या कृतीत येत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारताचे तुकडे केले. वंदे मातरम गीताचेही त्यांनी तुकडे केले आहे. अकाल तख्तवर हल्ला करणारे आज आम्हाला प्रश्न विचारतात. विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तसेच मणिपूरमध्ये काँग्रेसचे सरकार असतानाच तिथे अशांतता पसरली होती, असेही मोदी यावेळी म्हणाले.
सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2018 मध्ये, सभागृह नेता म्हणून मी त्यांना 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काम दिले होते. आता मी त्यांना 2028 मध्ये आणण्याचे काम देत आहे, पण किमान तयारी करून या. जेणेकरुन जनतेला तरी विरोधी पक्षाची पात्रता समजेल."
राहुल गांधींवर हल्लाबोल -सभागृहात मनापासून बोलण्याबाबत बोलले गेले. त्यांच्या डोक्याची स्थिती तर देशाला बऱ्याच काळापासून माहिती आहे. आता त्यांच्या हृदयाबाबतही समजले आहे. त्यामुळे त्यांचे मोदीप्रेम एवढे आहे की २४ तास त्यांना स्वप्नात मोदी दिसतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस कित्येक वर्षांपासून एकच उत्पादन लाँच करत आहे. पण, प्रत्येकवेळी लाँचिंग अपयशी होत आले आहे. मग हे जनतेवर राग काढतात, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
विरोधकांचा सभात्याग - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी लोकसभेत अविश्वास ठरावावर निवेदन करत होते. सुरुवातीच्या एका तासाच्या निवेदनात मोदींनी मणिपूरचा उल्लेख केला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर पंतप्रधान मोदींनी मणिपूर विषयावर निवेदन दिले आहे.
हेही वाचा -