नवी दिल्ली / पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेलेले नितीश कुमार यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत देशातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. नितीश कुमार यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह देखील उपस्थित होते.
विरोधी पक्षांना एकत्र आणणार : बैठकीनंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. बैठकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही आज अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही पुढील निवडणुका सर्व पक्षांना सोबत घेऊन लढणार आहोत. मात्र जिंकल्यावर पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न विचारला असता त्यावर सर्वांनीच मौन पाळले.
'लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात लढा देऊ' : यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांना एकत्र करण्यासाठी हे एक अतिशय ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. याद्वारे आम्ही विरोधी पक्षाकडे देशाप्रती असलेली दृष्टी विकसित करू. आम्ही सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन लोकशाही आणि देशावर होणाऱ्या हल्ल्याविरोधात एकत्र उभे राहून लढा देऊ. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, आम्ही बराच वेळ चर्चा केली. आता देशभरातील जास्तीत जास्त पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या पुढील काळात एकत्र काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
'तर भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही' : या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, जेडीयू अध्यक्ष ललन सिंह तसेच बिहार सरकारचे मंत्री संजय झा हे देखील उपस्थित होते. नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तत्पूर्वी, फेब्रुवारी महिन्यात नितीश कुमार यांनी काँग्रेस सोडून इतर सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने निवडणूक लढवल्यास भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, असे प्रतिपादन केले होते.
हेही वाचा : Sanjay Raut: महाविकास आघाडीत मतभेद नाही; हिंमत असेल चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या - संजय राऊत