पाटणा : बिहार विधानसभेत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीवरून गदारोळ झाला. छपरामध्ये बनावट दारूमुळे डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भाजपने हा मुद्दा सभागृहात जोरदारपणे मांडला. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा (Leader of Opposition Vijay Sinh) आणि नितीश कुमार यांच्यात दारूबंदीवरून बाचाबाची झाली ज्यादरम्यान नितीश कुमार संतापले. (Nitish Kumar got angry in Bihar assembly). त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माफी मागण्यास सांगितले.
दारूबंदीच्या नावाखाली गुन्हेगारीत वाढ : विरोधी पक्षनेते विजय सिन्हा सभागृहात म्हणाले, "बिहारमध्ये आज दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये दारूबंदी अपयशी ठरली आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. लोक रोज मरत आहेत. बिहारमध्ये हत्या, अपहरण, बलात्कार वाढले आहेत. सरकार काहीच करत नाही. भारतीय जनता पक्ष दारूबंदीच्या विरोधात नाही, मात्र दारूबंदीच्या नावाखाली गुन्हेगारांच्या टोळीने असे वातावरण निर्माण केले आहे. ते सर्व मुख्यमंत्र्यांच्या उद्दामपणामुळे आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
सभागृहाचे कामकाज तहकूब : दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. विजय सिन्हा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही लोकांनीही दारूबंदीचे समर्थन केले होते. यानंतर नितीश कुमार संतापले आणि त्यांनी इतरही अनेक गोष्टी बोलल्या. यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये आले आणि त्यांनी सतत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी भाजपच्या सदस्यांना त्यांच्या जागेवर बसण्यास सांगितले, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी ते मान्य केले नाही आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.