मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकते भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याचे एक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. केजीरवाल यांच्या या विधानानंतर आता भारतीय चलनावर वेगवेगळी चित्रे छापण्याची राजकीय नेत्यांसह काही लोक करत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आता शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक फोटो नोटेवर छापत 'ये सही हैं' असे कॅप्शन दिले आहे. त्यावरून आता जोरात चर्चा सुरू आहे.
![Nitesh Rane's tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16756433_rane.jpg)
याबाबत नितेश राणे म्हणाले की, ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. अशा महापुरुषाचा फोटो नोटांवर टाकला तर योग्य राहील ही माझी भावना आहे असे त्यांनी सांगितले. त्याचसोबत ही चर्चा सोशल मीडियात सुरू होती. त्यामुळे मी माझी भावना व्यक्त केली. जर केंद्र सरकार अशाप्रकारे विचार करत असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नोटांवर आला तर यापेक्षा मोठा बहुमान असू शकत नाही. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या ध्वजात महाराजांच्या विचारांना अनुसरून चिन्ह प्रकाशित केले. महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे. वरिष्ठ पातळीवर अशी काय शक्यता आहे का? ते तपासून पत्राद्वारे मागणी करेन असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
नोटेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, गौतम बुद्ध यांचे, फोटो का नसावेत असे प्रश्न उपस्थित केले आहेत. राणे यांनी थेट फोटोशॉप केलेल्या २०० रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर केला असून त्या नोटेवर मराठा आयकॉन छत्रपती शिवाजी साकारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कणकवलीचे आमदार राणे यांनी हा फोटो ट्विट करून परिपूर्ण असल्याचे लिहिले आहे. नोटेवरील चित्र बदलण्याची मागणी केजरीवाल यांच्यापासून सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, केजरीवाल हे गुजरात निवडणुक डोळ्यासमोर ठवून हे 'हिंदू कार्ड' खेळत आहेत असा थेट आरोप करण्यात आला आहे.
केजरीवाल यांच्या नोटेवरील चित्र बदलण्याचा सल्ला देत भाजप सातत्याने आपवर निशाणा साधत आहे. आपल्या सरकारच्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी 'राजकीय नाटक' केले जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याचवेळी संबित पात्रा म्हणाले की, केजरीवाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे काही सांगितले ते त्यांच्या यू-टर्न राजकारणाचा आणखी एक विस्तार आहे. त्याचा हा दांभिकपणा दिसून येतो.