हरियाणा - राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया (Wrestler Nisha Dahiya) प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. निशा दहियावर गोळीबार झाला असून, यात तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती, पण ही बातमी खोटी असल्याचे स्वत: निशानेच एक व्हिडिओ शेयर करत सांगितले आहे. मी सध्या गोंडामध्ये सिनियर नॅशनल खेळण्यासाठी आले आहे. मी व्यवस्थित असून माझ्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत, असे निशाने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. निशा दहियाचा हा व्हिडिओ रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, ज्या निशा दहियाचा मृत्यू झाला आहे तीदेखील नॅशनल लेव्हलची पैलवान असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण?
हरियाणातल्या सोनीपतमधल्या हलालपूर गावात निशा दहियावर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली होती. या गोळीबारामध्ये निशाचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता खुद्द निशाच समोर आल्यामुळे हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. निशा दहिया हिने एक व्हिडिओ शेअर करत आपल्याला काहीही झाले नसून, आपण एकदम सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या बाजूला साक्षी मलिकही दिसत आहे.
निशा दहिया ही भारताची कुस्तीपटू असून, 23 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने 65 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निशाचे कौतुक केले होते.e
दुसऱ्या निशाचा मृत्यू -
राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहियाचा मृत्यू झाल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ज्या निशाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे तीदेखील राष्ट्रीय कुस्तीपटू आहे.
हेही वाचा - ST Strike : लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणांवर निलंबनाची कारवाई