नवी दिल्ली Nipah Virus : केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार होतो आहे. आतापर्यंत सहा रूग्णांची अधिकृतपणे पुष्टी झाली असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय. आता आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. डॉ. राजीव बहल हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक आहेत. 'निपाह विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ४० ते ७० टक्के आहे. 'परंतु पूर्वीच्या उद्रेकात त्याचं प्रमाण लहान होतं आणि ते अल्प कालावधीसाठी टिकलं होतं', असं ते म्हणाले.
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू : '२०१८ मध्ये एकूण १८ प्रयोगशाळांनी या विषाणूची पुष्टी केली. त्यानंतर एका महिन्याच्या आत याचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला गेला. त्यामुळे शक्य तितक्या लवकर प्रतिबंधात्मक उपाय करणं महत्वाचे आहे', असे ते म्हणाले. 'राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रोटोकॉल लागू केले आहेत आणि एनसीडीसी, आयसीएमआर आणि इतरांच्या मदतीनं विषाणूचा संसर्ग आणि पुढील प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत', असं डॉ. राजीव बहल म्हणाले.
निपाहपासून वाचण्यासाठी सावधगिरीचे उपाय : निपाहचे नमुने तपासण्यासाठी ICMR ने मोबाईल BSL-3 प्रयोगशाळा स्थापन केली आहे. याशिवाय कोझिकोडमध्ये व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (VRDL) चं नेटवर्क देखील सक्रिय करण्यात आलंय. यासह ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (ICMR-NIE) च्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. डॉ. राजीव बहल यांनी निपाह व्हायरसपासून वाचण्यासाठी सावधगिरीचे उपाय सांगितले. निपाहपासून वाचण्यासाठी हात धुणे, संक्रमित किंवा संशयित रुग्णांच्या शरीरातील द्रवांशी संपर्क टाळणे, वटवाघुळांचं वास्तव्य असलेलं ठिकाण टाळणे, तसेच कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे, असं ते म्हणाले.
नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला : केरळच्या कोझिकोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून निपाह व्हायरसचा प्रसार वाढतोय. जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांना व्हायरसची लागण आली असून दोन जणांचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. राज्यात निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आलाय.
हेही वाचा :