नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसर्या लाटेत शेकडो मृतदेह गंगा नदीत तरंगताना आढळले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत तरंगलेल्या मृतदेहांबद्दल केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. आयोगाने दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव व सचिव, केंद्रीय जल मंत्रालय यांना चार आठवड्यांत कारवाईचा अहवाल देण्यास सांगितले आहे.
पवित्र गंगा नदीत मृतदेह विसर्जित करण्याची परंपरा जल अभियान, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या स्वच्छ गंगा प्रकल्प राष्ट्रीय मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. गंगेत मृतदेह आढळल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंत नोटीस बजावण्यात आली आहे. 11 मे रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
गंगेतून वाहत आले मृतदेह -
बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीच्या किनारी जवळपास ५० लोकांचे मृतदेह वाहून आल्याचे आढळून आले होते. मृतदेहांचे भटक्या कुत्र्यांनी लचकेही तोडल्याचे दिसून आले. कोरोना काळामध्ये घरातच मृत्यू झालेल्या, आणि अंत्यसंस्कार होऊ न शकलेल्या मृतदेहांना नातेवाईकांनी गंगेत फेकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बिहारसोबतच उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्येही असेच मृतदेह आढळून आले होते. उत्तर प्रदेश सरकारने यानंतर असे प्रकार होणार नसल्याचे आश्वासन बिहार सरकारला दिले होते.
हेही वाचा - बक्सर : नाथ बाबा घाटावर मिळाले आणखी आठ मृतदेह; गंगेतून आले वाहत