नवी दिल्ली : देशभरात ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घेतला आहे. देशातील ज्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता पातळी 'खराब' नोंदवण्यात आली आहे, त्याच शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात येणार आहे असे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोएल यांनी स्पष्ट केले आहे.
इतर ठिकाणी काय नियम..
ज्या शहरांमध्ये वा गावांमधील हवेची गुणवत्ता मध्यम किंवा त्यापेक्षा चांगली आहे त्याठिकाणी केवळ 'ग्रीन क्रॅकर्स', म्हणजेच प्रदूषणमुक्त फटाके विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच, याठिकाणी केवळ दिवाळीदरम्यान दोन तासांसाठी फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हेच नियम छठ पूजा, नववर्ष उत्सव आणि नाताळसाठी लागू करण्यात आले आहेत असेही गोएल यांनी सांगितले.
यासोबतच, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी चांगली आहे त्याठिकाणी फटाके बंदी लागू करण्याचे वा न करण्याचे स्वातंत्र्य स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. यासोबतच, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा : फटाकेमुक्त दिवाळी करण्याचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आवाहन