नवी दिल्ली: विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत, त्यांना आता दोनदा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलीय. त्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होतील. दोनदा परीक्षा द्यावी लागेल, असं म्हटल्यानंतर अनेकांच्या घशाला कोरड सुटली असेल.
विद्यार्थ्यांचा फायदा : पुढील शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतलाय. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आलाय. या निर्णयामुळे देशातील 10वी- 12वी बोर्डाच्या परीक्षा अधिक सुलभ होतील. एका वर्षात होणाऱ्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल. शिवाय अभ्यास पूर्ण झालेल्या विषयांचाच फक्त पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना असेल. तसेच इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक असेल. त्या दोन भाषांपैकी किमान एक भाषा भारतीय असणे अनिवार्य असेल.
विषय निवडण्याची संधी : पाठ्यपुस्तकांचा अभ्यास वर्गातच पूर्ण करण्याची सध्याची पद्धत बंद केली जाईल. नवीन अभ्यासक्रमाच्या फ्रेमवर्कनुसार आवश्यक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास अनुकूल बनवला जाईल. नवीन अभ्यासक्रमाचे काम हातात घेण्याआधी विद्यापीठाच्या अभ्यासक्रम पाहावा, असं बोर्ड परीक्षा घेणारे, मूल्यमापनकर्त्यांना सांगण्यात आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयानुसार बोर्डाच्या कठीण परीक्षा पद्धत अधिक सोपी करण्यात येणार आहे. पुढील काळात मागणीनुसार परीक्षा (ऑन-डिमांड) प्रणाली केली जाणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय. इयत्ता 11 आणि 12 च्या वर्गातील विद्यार्थ्यांना विषयांची निवड करण्यास कोणतेही बंधन नसेल. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विषय निवडता येतील. बोर्डाच्या परीक्षा या प्रशिक्षण आणि स्मरणशक्तीवर घेण्यापेक्षा कौशल्यांचे आकलन आणि यशाचे मूल्यांकनावर भर देणाऱ्या असाव्यात. (पीटीआय).
हेही वाचा-