भारतातील स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक आणि 'जय हिंद'चा नारा देणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी साजरी केली जाते. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. त्यांचा जन्म दिवस 'नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती' म्हणून साजरी करून त्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांना श्रद्धांजलीही वाहिली जाते. महत्त्वाचे म्हणजे, राजकारणी आणि विचारवंत नेताजी हे भारतीय राजकीय व्यवस्थेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी ओळखले जातात. यावर्षी, सुभाषचंद्र बोस यांची जयंती देखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात समाविष्ट केली जाईल, म्हणजेच आता प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 24 जानेवारी ऐवजी दरवर्षी 23 जानेवारीपासून सुरू होईल.
नेताजी यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी : सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती दत्त बोस होते. ते स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरू मानत. त्यांनी आझाद हिंद फौज या लष्करी रेजिमेंटची स्थापना केली, जी ब्रिटिशांचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आली होती. आझाद हिंद फौजेची स्थापना करून, बोस यांनी महिला बटालियनची स्थापना केली, ज्यामध्ये त्यांनी राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली. बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 1944 मध्ये त्यांनी रेडिओवर गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले होते. नेताजींनी लाखो तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.
'भारत छोडो' आंदोलन : नेताजींनी मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरा आणि भारतीय नागरी सेवा (ICS) परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला. त्यांनी आयसीएसची नोकरी सोडली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी 1921 मध्ये इंग्लंडमधून भारतात परतले. मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी म्हणाले होते की, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर इंग्रजांविरुद्ध युद्ध करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका सामाजिक क्रांतिकारकाची होती.अहिंसा आणि असहकार चळवळींनी प्रभावित झालेल्या सुभाषचंद्र बोस यांनी 'भारत छोडो' आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताचा राष्ट्रीय नारा : भारताच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेले हे वाक्य देशातील तरुणाईत प्राण फुंकणारे होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी दिलेला 'जय हिंद' हा नारा भारताचा 'राष्ट्रीय नारा' बनला आहे.