नवी दिल्ली NCERT India Name Change : एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये लवकरच मोठा बदल होऊ शकतो. एनसीईआरटी पॅनलनं एनसीईआरटीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं 'इंडिया' नाव बदलून 'भारत' असं लिहिण्याची शिफारस केली आहे. या बदलानंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द शिकवला जाईल.
इतिहासाची विभागणी केली जाणार नाही : पॅनेल सदस्यांपैकी एक सी.आय. आयझॅक यांनी सांगितलं की, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर NCERT पुस्तकांच्या पुढील संचामध्ये इंडिया हे नाव बदलून भारत केलं जाईल. यासह समितीनं पाठ्यपुस्तकांमध्ये 'प्राचीन इतिहास'च्या जागी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची शिफारस केली. 'भारतीय इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही. ब्रिटिशांनी ही विभागणी केली आहे. प्राचीन शब्दाद्वारे, त्याकाळी देश अंधारात होता, तेव्हा काही वैज्ञानिक जाणीव नव्हती असं दिसून येतं, असं आयझॅक म्हणाले.
एकमतानं शिफारस केली : ते पुढे म्हणाले की, ईस्ट इंडिया कंपनी आणि १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर 'इंडिया' हा शब्द सामान्यतः वापरला जाऊ लागला. मात्र 'भारत' या शब्दाचा उल्लेख विष्णु पुराण सारख्या प्राचीन ग्रंथात आढळतो. हे ग्रंथ सुमारे ७ हजार वर्ष जुने आहेत. यामुळे सर्व वर्गांच्या पुस्तकांमध्ये देशाच्या नावाचा उल्लेख 'भारत' असा करावा, अशी शिफारस समितीनं एकमतानं केल्याचं त्यांनी सांगितलं.
चर्चेला केव्हा सुरुवात झाली : देशाचं नाव 'इंडिया' की 'भारत', यावर तेव्हा चर्चा सुरू झाली, जेव्हा केंद्र सरकारनं जी-२० डिनरच्या निमंत्रणात नेहमीच्या 'प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेन्ट ऑफ भारत' असा उल्लेख केला. यानंतर देशात नाव बदलण्यावरून चर्चेला सुरुवात झाली. उल्लेखनीय म्हणजे, जी २० लीडर्स समिटच्या नेमप्लेटवर देखील 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव लिहिण्यात आलं होतं.
हेही वाचा :