हैदराबाद - काल एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या पार्टीतून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ड्रग कंट्रोलिंग एजन्सीने त्याची चौकशी केल्याच्या वृत्तावर अभिनेता सुनील शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी कोणतेही गृहितके बनवण्यापूर्वी तपासाच्या निकालाची वाट पाहावी, अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टी याने दिली.
हेही वाचा - Drugs Party Case : आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्यांपैकी ४ जणांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी
कथित ड्रग पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याच्या मुलाचे नाव येत असल्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, असे सुनील शेट्टी याला विचारण्यात आले असता, जेव्हा एखाद्या ठिकाणी छापा टाकला जातो, तेव्हा अनेक लोकांना ताब्यात घेतले जाते. आपण असे गृहीत धरतो की, एका विशिष्ट मुलाने ते सेवन (अमली पदार्थ) केले असावे. प्रक्रिया सुरू आहे. त्या मुलाला श्वास घेऊ द्या, वास्तविक अहवाल बाहेर येऊ द्या, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टी याने दिली.
आर्यन खानसह एकूण आठ जणांची चौकशी
अरबी समुद्रातील क्रुझ शिपवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानसह एकूण आठ जणांची चौकशी एनसीबीकडून केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, एनसीबीकडून आर्यनच्या मोबाईलची तपासणी सध्या केली जात आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आर्यन खानसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विविध तपासण्या सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. तसेच, या प्रकरणात आपल्या नावावर पार्टीत अनेकांना बोलाविण्यात आल्याचा दावा आर्यनने केला आहे. दुसरीकडे, आर्यनचे पिता शाहरूख खान दुबईत असल्याची माहिती मिळत आहे.
माझ्या नावे अनेकांना बोलाविले, आर्यनचा दावा
सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या नावावर पार्टीत अनेकांना बोलाविण्यात आल्याचा दावा आर्यनने केला आहे. पार्टीत काय होणार आहे याची माहिती त्याला नव्हती, असे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी आर्यनचा मोबाईल तपासत आहेत. त्याच्या मोबाईलमधील चॅट्स तपासले जात आहेत.
आर्यन खानसह चौकशी केली जात असलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत
1) मुनमुन धमेचा
2) नुपूर सारिका
3) इस्मित सिंह
4) मोहक जसवाल
5) विक्रांत छोकेर
6) गोमित चोप्रा
7) आर्यन खान
8) अरबाझ मर्चंट
हेही वाचा - शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही, कठोर कारवाई झाली पाहिजे - रामदास आठवले