चाईबासा (झारखंड) : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील बराजमदा ओपी पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी नक्षलवाद्यांनी स्फोटकांची लुट केली. नक्षलवाद्यांनी परंबलजोडी गावाच्या जंगलात असलेल्या डीके घोष कंपनीची स्फोटके लुटली आहेत. नक्षलवाद्यांनी गुरुवारी मध्यरात्री तेथील कंपनीच्या मॅगझिनवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात डिटोनेटर आणि अन्य स्फोटक साहित्य लुटले. नक्षलवाद्यांनी किती स्फोटक साहित्य लुटले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळल्यानंतर झारखंड पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रामनवमीच्या मिरवणुकीचा फायदा घेतला : गुरुवारी या परिसरात रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी सर्व पोलीस मिरवणुकीतील सुरक्षा व्यवस्था पाहण्यात व्यस्त होते. याचा फायदा घेत नक्षलवाद्यांची तुकडी बडाजमडा ओपी पोलीस स्टेशन हद्दीतील परंबलजोडी गावात पोहोचली. तेथील जंगलात डीके घोष कंपनीच्या स्फोटके असलेल्या मॅगझिनवर हल्ला करत त्यांनी तेथे ठेवलेली स्फोटके लुटून नेली.
पोलिसांचा तपास सुरु : डीके घोष कंपनी खाणींमध्ये स्फोटक साहित्य पुरवते. स्फोटक ठेवलेल्या ठिकाणी मॅगझिनच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी सुरक्षा रक्षकावर आहे. पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र आतापर्यंत किती स्फोटक साहित्य लुटण्यात आले याची माहिती मिळालेली नाही. हे तपासानंतरच स्पष्ट होईल'.
सुकमा जिल्ह्यात चकमक : गेल्या महिन्यात बस्तर विभागातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिस दलामध्ये चकमकीची घटना घडली. सुरक्षा दलाचे जवान परिसरात शोध मोहीमेसाठी गेले होते. त्यावेळी ही चकमक झाली. चकमकीनंतर जवानांनी बीजीएल आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले आहेत. बस्तर विभागाचे पोलिस जनरल सुंदरराज पी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जवानांच्या या कारवाईत सुमारे 5 ते 6 लक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.