कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला असून त्यात त्यांच्या डाव्या पायला गंभीर दुखापत झाली. कोलकाताच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, यावरून विरोधकांनी दीदींवर टीका केली. ममतांनी सहानभूती मिळवण्यासाठी हा स्टंट केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ममता बॅनर्जी ढोंगीपणा करत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताची सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली.
नंदीग्राममध्ये विजय मिळवणं, कठिण दिसताच, दीदींचा हा एक राजकीय ढोंगीपणा आहे. लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे नाटकं रचलं. लोकांच्या भावनांशी त्या खेळत आहेत, असे चौधरी म्हणाले.
काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. तर दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या. लोकशाहीमध्ये द्वेष आणि हिंसा हे अस्वीकार्य आहे. त्याचा निषेध केलाच पाहिजे, असे शर्मा यांनी ट्विट केले आहे. दोन काँग्रेस नेत्यांची वेगवेगळी मते देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
दीदींवर हल्ला -
उमेदवारीच अर्ज दाखल करण्यासाठी त्या नंदीग्राममध्ये पोहचल्या होत्या. एका मंदिरातून दर्शन घेत, ममता बॅनर्जी गाडीमध्ये बसत असताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. ममता बॅनर्जी यांचा एमआरआय करण्यात आला आहे. तपासणीत त्यांच्या डाव्या पायाला, उजव्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाली आहे. त्यांना 48 तास देखरेखी खाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसएसकेएम हॉस्पिटलचे डॉक्टर एम. बंडोपाध्याय यांनी पत्रकारांना सांगितलं.