मुंबई - National Farmers Day 2023 : आज 23 डिसेंबर रोजी देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जात आहे. हा दिवस शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे. भारतात शेतकऱ्याला अन्नदाता आणि मातीचा पुत्र म्हणतात. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आपल्या अल्पकाळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम राबवले. आज त्यांची जयंती आहे, म्हणून हा दिवस भारतात शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. 2001 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांची जयंती : चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक कायदे आणि धोरणे बनवली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. देशाचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह जुलै 1979 ते जानेवारी 1980 पर्यंत पंतप्रधान होते. या दिवशी कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचा विकास या विषयांवर विविध कार्यक्रम आणि चर्चासत्र आयोजित केले जातात. याशिवाय या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. शेतकऱ्यांचा देश म्हणून भारताची आजही एक ओळख आहे.
कर्जमुक्ती विधेयक : चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांना सावकारांपासून दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती विधेयक 1939 मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी 1949 मध्ये कृषी उत्पन्न बाजार विधेयक मांडलं. यानंतर ते 1952 मध्ये कृषी मंत्री झाले. 1953 मध्ये जमीनदारी प्रथा रद्द करण्यात आली. चौधरी चरणसिंह यांनी 1960 मध्ये कमाल जमीन धारणा कायदा आणला, ज्याचा उद्देश राज्यभरातील जमिनीची मालकी व्याप्ती सुसुत्र करून एकसमान बनवण्याचा होता. यानंतर 23 डिसेंबर 1978 रोजी किसान ट्रस्टची स्थापना झाली. भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश या कृषीप्रधान राज्यांमध्ये शेतकरी दिन प्रामुख्याने साजरा केला जातो.
भारत कृषीप्रधान देश : भारताव्यतिरिक्त अमेरिका, घाना, व्हिएतनाम आणि पाकिस्तानमध्ये देखील शेतकरी दिन साजरा केला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे, कारण तेच संपूर्ण देशातील जनतेचे पोट भरण्यात हातभार लावतात. कडक उष्ण हवामान, पाऊस, कडाक्याची थंडी याच्या कशाचीच पर्वा न करता ते रात्रंदिवस शेतात काम करतात. त्यामुळे आज आपण सुखी आयुष्य जगत आहोत. आजचा दिवस हा शेतकऱ्याचा आहे, त्यामुळं अनेकजण आपल्या सोशल मीडियावर शेतकऱ्यांना समर्पित पोस्ट शेअर करून त्यांना धन्यवाद देत आहेत.
हेही वाचा :