बंगळुरू - महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावी येथील प्रसिद्ध कन्नड योद्धा आणि स्वातंत्र्यसैनिक संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची कथित विटंबना केल्याच्या निषेधार्थ कर्नाटकात अनेक कन्नड समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यासाठी त्यांनी 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंद (Kannada activists call for Karnataka Bandh ) पुकारला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर ही महाराष्ट्र पळपुटी समिती आहे. रात्रीच्या अंधारात संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करतात, हिंमत असेल तर त्यांनी दिवसा येऊन दाखवावे. त्यामुळे अशा लोकांना आमच्या राज्यात ठेवता कामा नये. या देशद्रोह्यांना तडीपार करण्यात यावे, असे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा म्हणाले.
31 डिसेंबर रोजी कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कन्नड संघटनांमध्ये एकमत झाले नाही. एमईएस घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदचा निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरवले असून एमईएसवर बंदी घालण्याची हाक दिली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर हा वाद उफाळला आहे. याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे.
हेही वाचा - LIVE : हिवाळी अधिवेशन 2021 - विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण