मुजफ्फरनगर - जिल्ह्यातील मन्सूरपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोपा रोड येथील इव्हान मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटातून 63 स्टीलचे चमचे काढण्यात आले. (Spoons In The Stomach) डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपाडा गावात राहणारा विजय याला ड्रग्जचे व्यसन आहे. त्यामुळे विजयच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. शाल्मली येथील व्यसनमुक्ती केंद्रात विजय जवळपास महिनाभर थांबल्याचे सांगितले जात आहे. येथे त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना मुझफ्फरनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन दरम्यान विजयच्या पोटातून 63 स्टीलचे चमचे बाहेर आले. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. मात्र, ऑपरेशननंतरही विजयची प्रकृती चिंताजनक आहे.
आता प्रश्न असा पडतो की, विजयच्या पोटात इतके चमचे कसे गेले? सर्वसाधारणपणे, एखाद्या व्यक्तीला अन्नासोबत चमचा खाणे शक्य नसते. त्याचवेळी, विजयच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने चमचा खाऊ घातल्याचा आरोप आहे. मात्र, पीडितेने याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणी विजयवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विजयच्या पोटात 63 चमचे कसे गेले याची जोरदार चर्चा आहे.