बरेली - यूपीमधील बरेलीमध्ये लव्ह जिहादचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात एका मुस्लीम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला आहे. त्यानंतर या दोघांना समाज कंठकांकडून लव्ह जिहादच्या नावे त्रास दिला जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर या मुस्लीम मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून वरीष्ठ पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षा देण्यासंदर्भात मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
लव्ह जिहादशी संबंध जोडले जाणारे हे प्रकरण हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिठौरा गावात घडले आहे. येथील एका मुस्लीम मुलीने हिंदू मुलासोबत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केला होता. मंदिरात जाऊन वैदिक मंत्रोच्चारासह या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
मुलासोबत राहण्यासाठी मुलगी ठाम-
मंदिरात लग्न समारंभ पार पडल्यानंतर मुस्लीम असलेल्या नविवाहित मुलीने एक व्हिडियो व्हायरल करून बरेलीच्या पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षा देण्यासंदर्भात मागणी केली. त्यामध्ये तिने ती सज्ञान असल्याचे सांगत म्हटले आहे की, मी लहानपणापासूनच हिंदू रीति-रिवाजांचा आदर करत आले आहे. तसेच मी माझ्या मर्जीने पंकज शर्मा या युवकाशी लग्न केले आहे. आता मला त्याच्या सोबतच माझे आयुष्य घालवायचे आहे. त्यामुळे माझ्या पतीला आणि त्यांच्या मित्रांना त्रास देऊ नये अशी विनंती केली आहे.
अद्याप गुन्हा दाखल नाहीच-
या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, पोलीस अधीक्षक एसएसपी रोहित सिंह सजवाण यांच्या मतानुसार अशा प्रकारे जेवढी प्रकरणे समोर येतात, त्यामध्ये मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्मातील असतात. अशा वेळी पहिल्यांदा गुन्हा दाखल करून घेतला जातो. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून त्यांना कोर्टात हजर केले जाते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.