नवी दिल्ली/ मुंबई - बुली बाई अॅपने (Bulli Bai App) खळबळ उडवून दिली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांकडूनही याप्रकरणी सध्या वेगाने कारवाई सुरु आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून 21 वर्षाच्या तरुणाला, उत्तराखंडमधून 18 वर्षांच्या तरुणी आणि 21 वर्षीय तरुण शुभम रावतला अटक केली आहे. यात युवती 'जट खालसा 7' हे ट्विटर अकांऊट चालवत होती. तर हे जट खालसा या नावाने हे अकांउट का सुरू करण्यात आले आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.
शुभम रावत हा दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती आहे. त्याला कोटद्वारच्या निमुचौड परिसरातून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधूनच मुंबई पोलिसांनी बुली बाई अॅप ऑपरेट करणाऱ्या एका तरुणीला उधम सिंह नगर परिसरातून अटक केली होती.
'जट खालसा 7' नावाचे ट्विटर अकांऊट -
संबंधित तरुणी ही 'जट खालसा 7' नावाचे ट्विटर अकांऊट चालवत होती. या अकांऊटद्वारे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत. बुली बाई अॅप जनरेट करणाऱ्यांच्या ती संपर्कात असल्याची माहिती पोलीस अधिकारी ममता बोहरा यांनी दिली. तसेच बंगळुरूमधून अटक करण्यात आलेल्या विशाल कुमारशी तीचे अनेकदा बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.
नेपाळी कनेक्शन ?
ही तरुणी नुकतीच 12वी उत्तीर्ण झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तीची नेपाळी मुलगा गियूसोबत मैत्री झाली होती. आपण ट्विटर अकाउंट सोडणार असून त्याने तिला फेक अकांऊट (doc.acct) तयार करण्यास सांगितले होते. यानंतर तरुणीने तिचे ट्विटर अकाऊंट बदलून infinitude07 केले आणि ZATTkhalsa7 नावाने नवीन अकाउंट तयार केले. याच अकाउंटच्या माध्यमातून . बुली बाई अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो टाकण्यात आले होते.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या घराचा खर्चही वात्सल्य योजनेतून होतो. मुंबई पोलिसांनी आयपीसी 153A, 153B, 295A, 509, 500, 354D आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व गंभीर आरोप आहेत.
बुली बाई' अॅपबाबत तक्रार -
मुंबई पोलिस सायबर सेलच्या डीसीपीनुसार, दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. बुली बाई अॅपवर पत्रकारांसह 100 प्रमुख मुस्लिम महिलांची छायाचित्रे लिलावासाठी अपलोड करण्यात आली होती. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शनिवारी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृह आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे 'बुली बाई' अॅपबाबत तक्रार दाखल केली.
काय आहे बुली बाई अॅप?
बुली बाई ( Bulli Bai App ) या अॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
कोण आहे विशाल?
मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणी बंगळुरूवरून विशाल कुमार नावाच्या आरोपीला अटक केली. याच आरोपीने मुख्य आरोपीचे नाव उघड केले होते. विशाल कुमार हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. विशाल बुल्ली बाई अॅपवर महिलांचे फोटो एडीट करायचा आणि त्यानंतर ते फोटो अॅपवर अपलोड करत होता, अशी माहिती आहे. विशालनेच श्वेता सिंहच्या नावाचा खुलासा केला होता. त्यानंतर श्वेताल अटक करण्यात आले.
श्वेता सिंह आहे तरी कोण?
श्वेता सिंग ही 18 वर्षीय तरुणी उत्तराखंडची रहिवासी असून 12 वी पास आहे. सोशल मीडियावर मुस्लीम महिलांना बदनाम करण्याचे काम केल्याने मुंबई पोलिसांनी श्वेता सिंहला उधमसिंह नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे. श्वेताच्या आई आणि वडिल दोघांचे निधन झाले आहे. तीन बहिणी आणि एक भाऊ, असे तीचे कुटुंब असून ते आर्थिक संकटात सापडले आहे. तिच्या मनात मुस्लिमांबद्दल इतका द्वेष का निर्माण झाला, की तिने पैशांसाठी हे काम केले याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेताला मुंबईत आणलं जाणार आहे.
कोण आहे शुभम रावत?
श्वेता सिंहकडून शुभम रावत बद्दल माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुभमला उत्तराखंडमधून अटक केली आहे. शुभम रावत हा दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत होता. त्याला कोटद्वारच्या निमुचौड परिसरातून अटक करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना मुंबईत आणणार
बुली बाई ॲप प्रकरणात आज मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने उत्तराखंड मधून 21 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडून यामध्ये एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील आरोपी विशाल कुमार झा ला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले असून, श्वेता सिंग या आरोपीला उत्तराखंड मधून अटक केली आहे. त्या आरोपीला 5 दिवसाची ट्रांजेक्शन रिमांड उत्तराखंड मध्ये देण्यात आले आहे तर तिसरा आरोपी मयंक रावल याला आज अटक करण्यात आली आहे. या आरोपीची सुद्धा ट्रांजेक्शन रिमांड घेण्याचे काम उत्तराखंडमध्ये सुरू आहे. त्यानंतर या सर्व आरोपींना मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली आहे. हा अत्यंत संवेदनशील गुन्हा आहे. या गुन्ह्यातून अनेक चुकीच्या अफवा ही पसरवल्या जात असल्याने आणि आत्तापर्यंत काय कारवाई झालेली आहे याची खात्रीशीर माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या ॲप प्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून, सायबर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रकरणी तपास करताना आरोपींची नेमकी मोड्स ओपरेंडी काय होती हे देखील पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलय.
ट्विटर फॉलोअर्सच्या मागावर पोलीस
सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ॲप आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. 31 तारखेला हा ॲप लोड करण्यात आला होता अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. हा ॲप तसंच ज्या ट्विटर हॅन्डलवरुन या ॲपची माहिती दिली जात होती. त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली. तपास केला. त्यानंतर बुली बाई नावाचं ट्विटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं, हे देखील तपासात उघड झालं. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असा उद्देश ठेवून याच नावानं ट्विटर हॅन्डलही सुरु करण्यात आलं होतं. या ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्स कोण आहेत त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर मुंबई पोलीस लागले असता त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला एक विद्यार्थी या प्रकरणी संशयित आरोपी असून, त्याची देखील चौकशी केली जाते आहे. विशाल कुमार झा असं या संशयित आरोपीचं नाव असून, एका तरुणीलाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. श्वेता सिंग ही तरुणी या प्रकरणी संशियत आरोपी असून, तिच्यासह मयंक रावलला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
हेही वाचा - Bulli Bai App Case : मास्टर माईंड श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक; आज बांद्रा कोर्टात करणार हजर