गुवाहाटी - मणिपूरमध्ये रेल्वेमार्ग बांधकाम साइटवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यामध्ये किमान 16 जण मृत्युमुखी पडलेत. तसेच चिखलामध्ये सुमारे 70 बेपत्ता लोकांचा शोध रात्रभर सुरू होता. क्लिअरिंग ऑपरेशन पुन्हा सुरू केल्यावर बचावकर्त्यांना दोन मृतदेह सापडले. अधिकार्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
मदतकार्यात अडचणी - मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी या गावातील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक आपत्ती निवारण कर्मचारी आणि पोलिस बुलडोझरसारखी उपकरणे वापरत आहेत. परंतु भुसभुशीत जमिनीमुळे जड उपकरणे हलविणे कठीण होत आहे. या ठिकाणी अधूनमधून पाऊस सुरू आहे. रेल्वेरोड प्रकल्पाच्या परिसरात एक टेकडीच कोसळल्याने आतापर्यंत सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे अधिकारी गिते यांनी सांगितले.
टेकडी नदीत कोसळल्याने धरण - या ठिकाणी मातीचा ढिगारा नदीत पडल्याने परिसरात धरणासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. मृतांपैकी सात टेरिटोरियल आर्मीचे सदस्य आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतीय रेल्वेचे पाच अधिकारी होते. कारण या भागात बंडखोरांचा वावर असल्याने लष्कराचे कर्मचारी तेथे रेल्वे अधिकार्यांना सुरक्षा पुरवत होते.
झोपेत मृत्यूचा घाला - गुरुवारी पहाटे भूस्खलन झाले तेव्हा बहुतेक लोक झोपले होते. त्यातच त्यांच्यावर टेकाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. टेकडीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण गेल्याचे काही वाचलेल्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. "केंद्र सरकारकडून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी ट्विट करुन दिले.
पावसाने ईशान्येकडील आठ राज्ये त्रस्त - गेल्या तीन आठवड्यांतील सततच्या पावसाने ईशान्येकडील आठ राज्ये आणि 45 दशलक्ष लोक त्रासले आहेत. शेजारच्या बांगलादेशातही पावसाने कहर केला आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बांगलादेशमध्ये 17 मे पासून 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत.
संशोधकांचे मत - वैज्ञानिक म्हणतात की हवामानातील बदल हा अनियमित, लवकर पडणारा पाऊस ज्याने अभूतपूर्व पूर आला. दक्षिण आशियामध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यत: जूनमध्ये सुरू होतो. परंतु यावर्षी मार्चच्या सुरुवातीलाच ईशान्य भारत आणि बांगलादेशात मुसळधार पाऊस पडला. हवामान बदलामुळे वाढत्या जागतिक तापमानामुळे, तज्ञ म्हणतात की मान्सूनचा हंगाम अधिक बदलत चालला आहे, याचा अर्थ असा की संपूर्ण हंगामात पडणारा पाऊस कमी कालावधीत येतो.