कोलकाता - तृणमूल काँग्रेसने खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. कोलकाता येथे बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संघटनात्मक बैठकीत शनिवारी ही घोषणा करण्यात आली. एप्रिल ते मे या विधानसभा निवडणुकीतील निर्णायक विजयानंतर तृणमूलची ही पहिली बैठक होती. पक्षाने खासदार काकोली घोष दस्तीदा यांना पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी आणि अभिनेत्री सयोनी घोष यांची युवा शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सयोनी यांनी गेल्या महिन्यात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आतापर्यंत पडद्यामागे राहून काम करत होते. त्यांनी यापूर्वी युवा संघटनेचे नेतृत्व केले आहे. आता त्यांच्या पदोन्नतीनंतर ते त्या पदावरून हटतील. ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की पक्षाकडे "एक व्यक्ती, एक पद" फॉर्म्युला आहे.
2024 लोकसभा निवडणुकांसाठी टीएमसीची तयारी सुरू
बंगालच्या बाहेर तृणमूल काँग्रेसचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले. येत्या वर्षात उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव केल्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जीं यांना पंतप्रधानपदासाठी पंसती दिली आहे. तर देशाच्या पंतप्रधान व्हायचे, या उद्देशाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यांनी तशी घोषणा केलेली नाही. दरम्यान, पंतप्रधानपदासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. ममता बॅनर्जींकडून बिगरभाजप पक्षाला एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अभिषेक बॅनर्जी कोण आहेत?
अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण 24 परगनाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. त्यांनी 2011 मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत.