काठमांडू/सोलन - हिमाचलची गिर्यारोहक बलजीत कौरचे निधन झाल्याची बातमी मंगळवारी सकाळपासून व्हायरल होत आहे. मात्र, ती जिवंत असल्याची माहिती आता समोर आली आहे. काठमांडू येथील सरकार रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. अॅडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर 360 इन्शुरन्स कंपनीचे सीईओ प्रतीक यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मी स्वतः रुग्णालयात उपस्थित आहे. तसेच बलजीत पूर्णपणे सुरक्षित आहे. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार केले जात आहेत.
बलजीत कौर कोण आहे - बलजीत कौर ही हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील कंदाघाट उपविभागातील रहिवासी आहे. तिने आतापर्यंत जगातील अनेक कठीण शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत. बलजीत कौर सध्या सुखरूप असून, तिच्यावर काठमांडूमध्ये उपचार सुरू आहेत.
बलजीत कौर सुखरुप - बलजीत कौर हिने सोमवारी संध्याकाळी उशिरा ऑक्सिजनशिवाय अन्नपूर्णा पर्वत सर केला होता. कॅम्पमध्ये परतत असताना कॅम्प चारजवळ ती बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या बचावासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. मंगळवारी सकाळपासून मीडिया आणि सोशल मीडियावर बलजीतच्या मृत्यूची बातमी सुरू होती, मात्र दुपारी ती जिवंत असल्याची बातमी आली. बचावानंतरचा बलजीत कौरचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ती सुरक्षित दिसत असून, ती आपल्या चाहत्यांना थम्स अप करत आहे.
हेलिकॉप्टरद्वारे केली सुटका - मिळालेल्या माहितीनुसार, बलजीत कौर ही ट्रेक करत असताना आपला रस्ता चुकली होती पण, तिने रेडिओ सिग्नल पाठवण्यात यश मिळवले आणि या सिग्नलमुळे ती बचाव पथकाला सापडली आहे. GPS नुसार अन्नपूर्णा पर्वतावर 7,375 मीटर उंचीवर तिचे लोकेशन सापडले. त्यानंतर बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तिची सुटका केली. त्यानंतर तिला तातडीने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बलजीत कौर हिने सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजता दोन शेर्पा मार्गदर्शकांसह अन्नपूर्णा पर्वतावर चढाई पूर्ण केली होती.
मंत्र्यांनी खोटी पोस्ट हटवली - मंगळवारी सकाळपासूनच बलजीत कौरच्या मृत्यूची बातमी समोर येत होती, मात्र, ती बेपत्ता झाल्यामुळे कोणताही अधिकारी त्याला दुजोरा देत नव्हता. यातच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, आरोग्य मंत्री कर्नल धनी राम शांडिल, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अनेक नेत्यांनी ट्विट करून तिच्या मृत्यूची माहिती दिली होती. मात्र, बलजीतच्या बचावाची बातमी मिळताच मुख्यमंत्र्यांपासून सर्व नेत्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट काढून बलजीत सुखरूप राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.