नवी दिल्ली - मान्सूनचे केरळात आगमन झाले आहे. केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. येत्या 24 तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विज्ञान विभागाने म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात 11 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनचा पाऊस आज केरळच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसात कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात मान्सूनचे दमदार आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. यावेळी देखील तौक्ते चक्रीवादळमुळे मान्सून लांबणीवर पडेल, असे वाटत होते. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे.
दुष्काळाची शक्यता शून्य टक्के
स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सून सामान्य राहिल. यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के इतकी आहे. तर एकूण मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता 60 टक्के असल्याने पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जूनमध्ये सरासरीच्या 106 टक्के पर्जन्यमानाचा, जुलैमध्ये सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमानाचा, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 99 टक्के पर्जन्यमानाचा, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 116 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.