नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी मोदींनी कुस्तीपटू विनेश फोगटशी संवाद साधला. मोदींनी विनेशच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि मुलींच्या संगोपन करण्याच्या पद्धतींबद्दल विचारले. तुमचे कुटुंब तंदरूस्त राहण्यासाठी कोणत्या चक्कीचा आटा खाते, असा सवाल मोदींनी केला. यावर महावीर फोगट यांनी उत्तर दिले की, आम्ही आमच्या गावातील चक्कीचा आटा आणि गायींच्या दुधापासून बनलेले तूप आणि लोणी खातो.
कुस्ती खेळाच्या कौटुंबिक वारशामुळे वाढलेल्या अपेक्षांचा सामना कशाप्रकारे करत आहे, असा सवाल मोदींनी विनेशला केला. यावर विनेश म्हणाली की, 'अपेक्षा महत्वाच्या आहेत. कारण त्या चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करतात. अपेक्षांचा कोणताही दबाव नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी खेळाडूंना मानसिकदृष्ट्या बळकट असले पाहिजे. कुटुंबाची भूमिका महत्वाची असून मला नेहमीच कुटूंबाचा पाठिंबा मिळाला आहे, असे विनेश म्हणाली.
विनेश फोगाट ही दंगल गर्ल बबिता फोगट आणि गीता फोगट याचा चुलत बहिण आहे. 2018 साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 2020 मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही महावीर सिंग फोगट यांची पुतणी असून महावीर फोगट यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी फोगट तसेच रितू फोगट या सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत.