अलीगड (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातून शनिवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. या बातमीचा तुम्हा आम्हा सर्वांचा अगदी जवळचा संबंध आहे.
खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला : येथील धानीपूर मंडी भागात राहणाऱ्या एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात हे गृहस्थ जबर जखमी झाले आहेत. स्फोटामुळे मोबाईल चक्क दूरवर उडून गेला. तर या गृहस्थाच्या हाताला आणि मांडीला जबर दुखापत झाली. त्यांना पंडित दीनदयाळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या गृहस्थांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता मोबाईल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हाताला आणि मांडीला दुखापत : पीडित व्यावसायिक प्रेमराज सिंह यांनी आपल्या तक्रारीमध्ये सांगितले की, ते शनिवारी त्यांच्या घरी होते. अचानक त्यांच्या पँटमधून धूर निघाला आणि खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. हे पाहून ते पूर्णपणे घाबरले. त्यानंतर त्यांनी लगेचच खिशातून मोबाईल काढून फेकून दिला. खिशातून मोबाईल फेकल्यानंतरही त्यातून १० ते १५ मिनिटे धूर येत होता. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला आणि डाव्या बाजूच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेले.
मोबाईलचे दोन तुकडे झाले : प्रेमराज सिंह यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर मोबाईलचे दोन तुकडे झाले. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. गेल्या एक दशकापासून ते एका प्रसिद्ध कंपनीचा मोबाईल वापरत होते. मात्र या घटनेनंतर आता त्यांचा या मोबाईल कंपनीवरील विश्वास उडाला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा महुआ खेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे जीवित आणि वित्तहानीही झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
हेही वाचा :