पुलवामा (जम्मू -काश्मीर) - पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत दोन अतिरेकी मारले गेले आहेत. चकमक संपल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे, असे जम्मू -काश्मीर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
माहितीनुसार, ठार झालेले दोन्ही अतिरेकी स्थानिक आहेत आणि ते हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमने गुप्त माहितीवर कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन (सीएएसओ) सुरू केले होते. सैन्याचे संयुक्त पथक संशयित घटनास्थळी पोहोचले. तेव्हा लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावर सुरक्षा दलाकडून योग्य प्रत्युत्तर देण्यात आले.
![Two militants killed in encounter at Khrew Pampore of J&K's Pulwama](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12824637_jk.jpg)
जानेवरी 2021 पासून जम्मू-काश्मीरमध्ये 89 अतिरेकी ठार -
जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 अतिरेक्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले, असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला -
राजौरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते जसबीर सिंग यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्यांवर हल्ले होत आहेत. यापूर्वीही दहशतवाद्यांनीएका भाजपा कार्यकर्त्याची गोळी मारून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या आधीही काश्मीर खोऱ्यातल्या विविध भागांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हत्या झाली आहे.