भुवनेश्वर - देश कोरोनाजन्य परिस्थितीमुळे हैराण असताना चक्रीवादळाचं संकट भारतात येऊन धडकलं आहे. नुकतेच तौक्ते चक्रिवादळाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. हे वादळ शमते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे. भारतीय हवामान खात्याने 'यास' वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यानंतर 72 तासात या वादळाचे मोठ्या प्रलयकारी वादळात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. पश्चिम तटावर 25 मे पासून मध्यम ते अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 26 मे रोजी सायंकाळपर्यंत या वादळाचा तडाखा अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या किनारी भागांना बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाला 'यास' हे नाव ओमानकडून देण्यात आले आहे.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू -
चक्रीवादळाच्या वादळाचा इशारा दिल्यानंतर ओडिशाने त्याचा सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. ओडिशाच्या विशेष मदत आयुक्तांनी एनडीआरएफ, ओडीआरएएफ, ओडिशा पोलीस आणि अग्निशमन सेवा विभागाशी संभाव्य चक्रीवादळाविषयी बैठक घेतली. 10 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन अधिकारी, एडीएम आणि आपत्कालीन अधिकऱ्यांशी चर्चा केली.
तौक्ते चक्री वादळामुळे मोठे नुकसान -
तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईसह राज्याच्या कोकण किनारपट्टीला बसला आहे. यासोबतच राज्याच्या अजूनही काही जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले. तर तिथेच कोळी बांधवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी, ही अपेक्षा नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांकडून व्यक्त केली जात आहे. या वादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. मोठ्या प्रमाणात शेतमाल आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. तर किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी बांधवांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.