सिअॅटल - मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांचे कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत प्रेमप्रकरण होते. त्यांच्याविरोधात चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असताना बिल गेट्स यांनी बोर्डाचे सदस्य म्हणून काम करणं हे कंपनीच्या नियमात बसत नसल्याचं बोर्डाने म्हटलं होते. तेव्हा बोर्ड सदस्याच्या दबावाखाली बिल गेट्स यांनी राजीनामा दिला होता. ही माहिती द वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे.
मायक्रोसॉफ्ट अभियंत्या कर्मचारी महिलेने गेट्सशी अनेक वर्षांपासून लैंगिक संबंध असल्याचे एका आरोप पत्रात म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यासाठी 2019 मध्ये एका लॉ कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
20 वर्षांपूर्वी होते प्रेमप्रकरण -
बिल गेट्स यांचे सहकर्मी महिलेसोबत 20 वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण होते. हे प्रेमप्रकरण दोघांच्या संमतीने संपवण्यात आले होते. बिल गेट्स यांनी पदाचा राजीनामा देण्याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नव्हता, असं गेट्स यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले. मायक्रोसॉफ्ट कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा सामाजिक कामाला वेळ देता यावा, यासाठी घेतल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
मायक्रोसॉफ्टची असोसिएटेड प्रेसला माहिती -
रविवारी रात्री उशिरा असोसिएटेड प्रेसला पाठविलेल्या ईमेलमध्ये मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, बिल गेट्स यांचे महिला कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध होते, हे 2019 मध्ये एका पत्राद्वारे समोर आले. कंपनीने याचा आढावा घेतला. तसेच सखोल तपासणी करण्यासाठी बाहेरील कायदेशीर संस्थेची नेमणूक केली. संपूर्ण तपासणीत मायक्रोसॉफ्टने संबंधित महिलेला पूर्ण पाठिंबा दिला.
बिल आणि मेलिंडा गेट्स घेणार घटस्फोट -
विशेष म्हणजे नुकतचं बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली 27 वर्षे ते एकमेकांसोबत होते. मेलिंडा गेट्स या मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापकही आहेत. एकमेकांपासून विभक्त होत असलो, तरी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसाठी आपण एकत्रच काम करणार असल्याचे मेलिंडा यांनी स्पष्ट केले. ही जगातील सर्वात मोठी चॅरिटेबल फाऊंडेशन आहे. या दाम्पत्याला तीन अपत्येही आहेत. मेलिंडा या 1987 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या. 1994 ला हवाईमध्ये बिल आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.
बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातून पायउतार -
बिल गेट्स यांनी 2020 ला मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परोपकारी सेवांसाठी अधिक वेळ देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 25 वर्षे काम केले आहे. त्यांनी 2000 मध्ये स्टीव बॉल्मर यांच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपविली. तर सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची 2014 मध्ये जबाबदारी घेतली आहे. बिल गेट्स यांनी पॉल एलेन यांच्यासमवेत 1975 मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.
हेही वाचा - बिल आणि मेलिंडा गेट्स घेणार घटस्फोट; २७ वर्षांचा होता संसार