नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा खोळंबत आहेत. अभियांत्रिकीची प्रवेशपूर्व परीक्षा असलेली जीईई-मेन्स कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे.
जीईई-मेन्स ही 24 मे ते 28 मे दरम्यान होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) काढले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात नियोजित असलेल्या जीईई-मेन्सचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचेही एनटीएने म्हटले आहे. मे महिन्यातील सेशनसाठी नोंदणी पुढील टप्प्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही एनटीएने म्हटले आहे.
हेही वाचा-दिल्लीमधील बेस रुग्णालयाला ऑक्सिजनचा कमी पुरवठा; सैन्यदलाची सरकारकडे तक्रार
एप्रिलमध्ये पुढे ढकलण्यात आली होती परीक्षा-
यापूर्वी देशातील कोरोनाची दुसरी लाट पाहता अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स पुढे ढकलण्याचा निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. 27 ते 30 एप्रिलदरम्यान ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, आता पुढील सूचना मिळेपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली होती.
हेही वाचा-पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांची आज व्हर्चुअल बैठक; 'रोडमॅप २०३०' होणार लॉंच
दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट-पीजी) परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. नीट-पीजी परीक्षा ऑगस्टपूर्वी होणार नाही. परीक्षेची तारीख एक महिना आधी जाहीर करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने 3 एप्रिलला म्हटले आहे.