नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरच्या नगरोटा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गुरुवारी झालेल्या या चकमकीची सूत्रे कुख्यात आतिरेकी मसूद अजहरचा भाऊ पाकिस्तानातून सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानची सिक्रेट सर्व्हिस एजन्सी आयएसआयने जैश-ए-मोहम्मदला पुलवामासारखा आत्मघातकी हल्ला करण्याची जबाबदारी दिली होती. यासाठी चार दहशतवाद्यांची 18/19 नोव्हेंबरला सांबा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यात आली. मात्र, सुरक्षा दलांनी जम्मू सेक्टरच्या नगरोटा परिसरात त्यांना कंठस्नान घातले.
आयएसआयची हल्लेखोरांना फूस
सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार पुलवामासारखा मोठा हल्ला करण्यासाठी या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यात आले होते. यासाठी मौलाना मसूद अजहरच्या नेतृत्वातील जैश-ए-मोहम्मद या आतेरिकी संघटनेला ही जबाबदारी देण्यात आली. याचसोबत काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा घडवून आणणाऱ्या संघटनांना यामुळे बळ मिळणार होतं. मात्र सुरक्षा दलाला या मोहिमेची बातमी मिळताच संबंधित हल्लेखोरांना वेळीच ट्रॅक करण्यात आले. यावेळी नगरोटा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.