मडगाव (गोवा): याबाबत अधिक माहिती अशी की, वंदे भारत रेल्वे सेवेचा फायदा मुंबईशी जलद दळणवळण करण्यासाठी होणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गला भेट देतात. सावंतवाडी हे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेजवळचे ठिकाण आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दोन थांबे दिल्यास पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल व पर्यटन वाढेल. मात्र, या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच थांबा दिल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दीपक केसरकरांचे पत्र: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी येथे दुसरा थांबा देण्यात यावा, अशी मागणी यातून करण्यात आली आहे. तर, केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी पुढील टप्प्यात लवकरच वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी येथे दुसरा थांबा मिळेल, असे आश्वासन दीपक केसरकर यांना दिले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी व जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
'या' स्थानकांवर थांबणार गाडी: रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. शुक्रवारी ही गाडी प्रवाशांच्या सेवेत नसेल. जर एखाद्या प्रवाशाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर त्याला सीएसएमटी येथून पहाटे ५.२५ वाजता ही ट्रेन मिळेल. ती मडगाव, गोव्याला दुपारी १.१५ वाजता पोहोचेल. तर ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. तसेच दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम स्थानकात थांबे असतील.
हेही वाचा: